मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंचं नाव निश्चित, शहराला मिळणार पहिली महिला आयुक्त !!

मुंबई : राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अखेर नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आणि “मेट्रो वूमन” म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची या पदासाठी निवड करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे. सध्या त्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे. 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या भिडे यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत या नियुक्तीवर अंतिम चर्चा झाली. या वेळी असिम गुप्ता आणि अश्विनी भिडे या दोन नावांचा विचार करण्यात आला होता. मात्र अखेरीस अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे.

सुरुवातीला अश्विनी भिडे यांच्या नावाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी रात्री अश्विनी भिडे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली. यानंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकारी असून त्यांनी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रोजेक्टच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्यासोबत मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, संजय मुखर्जी यांचीही नावं चर्चेत होती. परंतु, या तीनही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड होणाऱ्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. या आधी त्यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुराही सांभाळली आहे. अश्विनी भिडे यांना आयुक्तपदाचा तीन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी एक महिला आहेत आणि त्याचवेळी आयुक्तपदीही महिलेची नियुक्ती होणार असल्याने महापालिकेवर महिला राज आल्याची चर्चा आहे.

गेल्या काही काळापासून मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर सातत्याने भ्रष्टाचाराचे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तपदाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे आल्याने, महापालिका प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचं महत्त्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Leave a Reply