अचानक मॉलमध्ये आग लागली आणि…

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

अचानक मॉल मध्ये सायरन वाजवत आलेले अग्निशमन दलाचे बंब… त्यातून उतरलेल्या जवानांची धावाधाव करून आग विझविण्यासाठी होणारे शर्थीचे प्रयत्न… इतक्यात काही जवानांनी एका व्यक्तीला आगीतून वाचवत रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेणे… या सगळ्यामुळे उपस्थितांची बसलेली पाचावर धारण…. पण इथे कोणतीही आग लागली नसून केवळ मॉकड्रिल असल्याचे समजताच शेकडो नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली. अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल आदी ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल आयोजित केली जाते. बुधवारी (दि. 17) वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम या मॉल मधून रहाटणी उप अग्निशमन केंद्रात सकाळी 10 वाजेच्या सुमारास आग लागल्याची वर्दी देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाचे 2 बंब त्वरित घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी प्रत्यक्ष कार्यवाही करतेवेळी अग्निशमन जवानांनी धुरामुळे बेशुद्ध झालेल्या इसमाला त्वरित बाहेर काढत रुग्णवाहिकेतून जवळच्या दवाखान्यात रवाना केले व आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळवले.

पण हे सगळे प्रत्यक्षात घडले नसून आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता मॉल प्रशासन व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमानाने फिनिक्स मॉल येथील उपस्थित नागरिक, दुकानदार, सुरक्षारक्षक, स्टोर किपर यांना आगीच्या व आणीबाणीच्या प्रसंगी शास्त्रीय पद्धतीने काय केले पाहिजे याची माहिती मॉकड्रिल घेऊन देण्यात आली. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य तो समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल व वित्तहानी तसेच जीवितहानी होण्यापासून टाळता येईल. अग्निशमन विभागाकडून अग्निशमन उपकरणांची हाताळणी प्रात्यक्षिके नागरिकांकडून व मॉल मधील कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुमारे 500 लोकांना अग्नी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले. ही आपत्कालीन परिस्थिती ही खरीखुरी नसून मॉकड्रिल आहे हे लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मॉकड्रिल करते वेळी सब ऑफिसर विजय घुगे, लिडींग फायरमन अनिल वाघ, लिडींग फायरमन विकास तोडरमल, ऑपरेटर संभाजी दराडे, ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, ट्रेनी सब ऑफिसर शुभम वाकडे, वाहन चालक घोरपडे, ट्रेनी फायरमन परमेश्वर दराडे, मयुर नवगिरे, प्रशांत नवगिरे, राजू चिंता, आकाश वाघमळे, शुभम जगताप हे उपस्थित होते. मॉलचे केंद्रीय संचालक विक्रम पाई, महाव्यवस्थापक जवाझ शेख, मुख्य सुरक्षा अधिकारी सोहेल शेख, मुख्य अग्निशमक व्यवस्थापक सुबोध शर्मा, उपमुख्य अग्निशमन व्यवस्थापक शुभोदीप चक्रवर्ती यांच्या समक्ष व सहकार्याने ही मॉकड्रिल आयोजित करण्यात आली.

Share

Leave a Reply