पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वारंवार अश्लील शेरेबाजी केल्याची माहिती देणारी निनावी पोस्ट शिकाऊ महिला डॉक्टरने सोशल मीडियावर टाकली याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन विभागप्रमुखाची चौकशी सुरू केली असली तरी हा प्रकार निंदाजनक आहेच. मात्र त्या पेक्षाही अधिक चीड आणि संताप आणणारा असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी म्हटले. पालिका रुग्णालयातील असे प्रकार तातडीने थांबले नाही तर याला शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना गुरुवारी भेटून उबाळे यांनी निवेदन दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अनिता तुतारे, सुजाता काटे, योगिनी मोहन, बेबी सय्यद, अश्विनी खंडेराव, सोनाली तुतारे, तसलीम शेख, नीलम म्हात्रे, पल्लवी लहाने, सुषमा बोरकर, निलेश खंडेराव, प्रिया निकेब, प्रणव दंडीकवार, प्रवीण गोडबोले, ऋषी ढाकणे, राकेश कुमार, सुजाता जाधव, रुपेश गडकर, विवेक चव्हाण, गौतम लहाने, संतोष म्हात्रे हे
पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
ट्रेनी महिला डॉक्टरांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या महिला ट्रेनी डॉक्टरांनी वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने वारंवार लैंगिक छळ केला, जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले, शिकवताना अश्लील बोलून मुलींना त्रास दिला, असे या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. यानंतर चौकशी झाली. संबंधित डॉक्टरांचा पदभार काढून घेण्यात आला .हे सोपस्कार जरी पार पाडले असले तरी मूळ मुद्दा अतिशय गंभीर आहे. या ट्रेनी डॉक्टरांच्या काही समस्या असतील किंवा त्यांना काही तक्रारी असतील तर महापालिकेची अंतर्गत यंत्रणा त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला उपलब्ध नाही का? आपली विशाखा समिती अशावेळी काय करत आहे? मुळात अशी समिती आता अस्तित्वात आहे का असा देखील प्रश्न आहे. रुग्णालयातील वरिष्ठ या ट्रेनी डॉक्टरांचे ऐकून घेत नाहीत का? या महिला ट्रेनी डॉक्टर असेही म्हणत आहेत की स्थानिक भाषेमध्ये हे डॉक्टर आपसात शेरेबाजी करतात? असे वागून हे डॉक्टर आपल्या रुग्णालयाचा पर्यायाने आपल्या शहराच्या नावलौकिकाला बट्टा लावत आहेत.
9 जुलै 2024 रोजी अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल झाली होती मात्र त्यानंतर ती डिलीट करण्यात आली. याचाच अर्थ ट्रेनी डॉक्टरांवर प्रशासनाचा दबाव आहे. 10 जुलै 2024 रोजी काही वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. संबंधित डॉक्टर ज्यावर आत्ता आरोप होत आहे. त्यांच्यावर यापूर्वीही असे गंभीर आरोप झाले होते.
त्यावेळी देखील त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र ठोस कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा असे प्रकार समोर येत आहेत. याबाबत आता ठोस उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलने समज देण्यात येईल. असा इशारा शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत गंभीर पावले उचलण्यात आली असून प्रशासन ठोस कारवाई करणार असल्याचे आश्वासन रुग्णालयाच्या वतीने राजेंद्र वाबळे यांनी दिले असल्याचे उबाळे म्हणाल्या