सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी गुरूवारी (दि. २५) पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी कारागृहातील महिलांशी संवाद साधला. सुधारणा व पुनर्वसन या धोरणा अंतर्गत कारागृहातील बंद्यांकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुरुवारी पुण्यातील भोई प्रतिष्ठान संस्थेच्या (pune) वतीने कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांचे संकल्पनेतून महिला बंद्यांकरिता सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अलका कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अलका कुबल यांनी महिला बंद्यांना महिला सबलीकरणबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी खचून न जाता जिद्दीने संकटांचा सामना करून परत नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांना मानसिक आधार देत सर्व बंदी महिला आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला.
या कार्यक्रमाला येरवडा कारागृह अधीक्षक अनिल खामकर, उपअधीक्षक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी तेजश्री पोवार, भोई प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.