आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात जोरदार फलकबाजी

आता वेळ आली आहे… बदल घडवण्याची !

भोसरी, टीम न्यू महाराष्ट्र:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या १० वर्षांच्या कारभाराला लक्ष्य केले आहे. ‘१० वर्षे पोकळ जाहिरातबाजीची… १० वर्षे प्रतीक्षा ‘रेड झोन’ हटविण्याची… १० वर्षे प्रतीक्षा हक्काच्या पाण्याची… १० वर्षे समाविष्ट गावांच्या अधोगतीची… १० वर्षे इतरांच्या कामांचे श्रेय लाटण्याची… आता वेळ आली आहे… बदल घडवण्याची।’ अशा आशयाचे अज्ञात व्यक्तीने संपूर्ण मतदारसंघात फलक लावून आमदार लांडगे यांना टार्गेट केले आहे.

लांडगे हे गेल्या १० वर्षांपासून भोसरी विधानसभेचे आमदार आहेत, पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर लढले आणि जिंकले. दोन्ही निवडणुकांवेळी आमदार लांडगे यांनी मतदारसंघातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. जनतेला ‘व्हिजन २०२०’चे स्वप्न दाखविले होते. यामधील विविध विकासकामे प्रलंबित आहेत. तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असताना आमदार लांडगे यांच्याविरोधात मोठी नाराजी निर्माण

झाली आहे. दिघी, चऱ्होली, तळवडे, मोशी, चिखली या भागांतील विविध प्रलंबित प्रश्न आहेत. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये आमदार लांडगे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून संपूर्ण मतदारसंघात आमदार लांडगे यांच्या १० वर्षांच्या कारभाराची चिरफाड करणारे फलक झळकले आहेत.

………

जाहिरातफलक रातोरात काढण्याचा प्रयत्न

मतदारसंघातील विविध भागांत आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात जोरदार फलक लावून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, हे जाहिरातफलक काढून घेण्यासाठी आमदारांच्या माणसांनी महापालिकेतील आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर रातोरात हे जाहिरात फलक हटवण्याचे काम आमदारांचे कार्यकर्ते करत होते.

Share

Leave a Reply