ईडीच्या लढाईत जयंत पाटील एकाकी?

ईडीच्या लढाईत जयंत पाटील एकाकी?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. जवळपास साडेनऊ तास जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयात होते. ही चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांना राज्यातील अनेक नेत्यांनी फोन केले आणि त्यांची विचारपूस केली. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, मी फोन आलेल्यापैकी कोणाचंही नाव घेणार नाही. सर्व पक्षातील मित्रांनी मला फोन केले. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर चूक होईल, म्हणून मी कोणत्याही नेत्याचे नाव घेत नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र, अजित पवारांचा फोन आला होता का, असा प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांचा फोन आला नसल्याचे स्पषपणे सांगितले. यावरुन आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चा आणि कुजबूज सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे जयंत पाटील यांची ईडी चौकशी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते त्यांच्यापासून अंतर राखून असल्याचे दिसले. काल जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले असताना या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक निदर्शने करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी प्रदेश कार्यालयात हजर असणे अपेक्षित होते. पण जयंत पाटील यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असताना कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राजेश टोपे, धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांच्यापैकी कोणीही प्रदेश कार्यालयात दिसले नाही. फक्त जितेंद्र आव्हाडच प्रदेश कार्यालयात हजर होते. त्यामुळे ईडीच्या फेऱ्यात अडकलेले जयंत पाटील हे मदतीची सर्वात जास्त गरज असताना पक्षात एकटे पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी जयंत पाटील हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीत जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात ईडीच्या चौकशीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply