कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
बंगळुरू : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
के. सी. वेणुगोपाल पुढे बोलताना म्हणाले की, सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. १३ मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, १४ मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली. ते म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघेही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत विजय झाल्यानंतर १४ मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) संध्याकाळी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून विधिमंडळ पक्षनेते निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. यानंतर आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बंगळुरूला पाठवलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया हे तीन निरीक्षक सोमवारी दिल्लीत परतले. या नेत्यांनी आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही घेतले.