मुंबई – भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीची गळचेपी करणारा पक्ष आहे. त्यामुळे देशातील जनता भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, हेच कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या विजयातून स्पष्ट होते. कर्नाटकात तंबू ठोकून बसलेल्या मोदी-शहा या जोडगोळीचा पराभव आहे. एका अर्थाने भाजप सरकारला लागलेली ही उतरती कळा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिली.
वरपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पाठीमागच्या निवडणुकीतही कर्नाटकमधील जनतेने काँग्रेसलाच कौल दिला होता. मात्र, भाजपने घाणेरडे राजकारण करीत सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीत मात्र भाजपला ती संधी मिळणारच नाही. मतदानाचा वाढलेला टक्का हा सुशिक्षित मतदार होता जो काँग्रेसच्या मागे ठामपणे उभा राहिला. वाढती महागाई, बेरोजगारी, जाती-धर्म द्वेष, सुडाचे राजकारण या गोष्टींना देशातील जनता कंटाळली आहे, हेच या निकालावरून स्पष्ट होते. याशिवाय सरकारविरोधी लाटेचा सामना भाजपला करावा लागला आहे. काँग्रेसच्या या विजयाचे महत्त्वाचे कारण हे आहे की भाजप जेव्हा काँग्रेसवर टीका करीत होती तेव्हा काँग्रेस टिकेकडे दुर्लक्ष करीत कर्नाटकातील जनतेसाठी जाहिरनामा बनवत होती.
याच जाहीरनाम्यावर आणि हनुमानाच्या अपमानाबद्दल वारंवार टीका केली. मात्र, कर्नाटकमधील मतदारराजाने या मुद्द्याना गांभीर्याने घेतले नाही. वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर मतदारांनी तडजोड न करता काँग्रेसवर विश्वास ठेवला. इतर राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही मोदी-शहांचा करिष्मा चालणार नाही. कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती या राज्यातही अटळ आहे, असा विश्वासही रविकांत वरपे यांनी व्यक्त केला.