कर्नाटक ; मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार
बंगळूर : काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे दिल्लीत लॉबिंग सुरू असून, आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांसह १८ मंत्र्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तेथे ५० हून अधिक आमदार तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्यांच्या वाटपावर दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी दोन तास चर्चा केली. मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या यादीशिवाय दोन नावे घेण्यात आली असून, त्यापैकी एकाचे नाव निवडण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना काँग्रेस हायकमांडने आठ सूत्रे राबवून मंत्रिपद दिले जात आहे.
लोकसभा निवडणूक समोर ठेवून मंत्र्यांची यादी अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ आमदारांना डावलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभा निवडणूक लढवली नाही, तरी काँग्रेसचे मोठे नुकसान होणार नाही. त्यासाठी हायकमांडने ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दिल्लीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही मंत्रीमंडळात आपल्या निष्ठावंतांची नावे पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परिणामी खात्यांच्या वाटपात विलंब होत आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३४ मंत्री असू शकतात. आमदार लक्ष्मण सवदी, कृष्णा बैरेगौडा, दिनेश गुंडूराव आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतली.
शपथविधीपूर्वी सिद्धरामय्या यांनी विधान परिषदेचे नेते बी. के. हरिप्रसाद आणि शांतिनगरचे आमदार एन. ए. हॅरिस यांचा मंत्रिमंडळात समावेशावर नकार दिला. तर कृष्णा बैरेगौडा, दिनेश गुंडूराव, जमीर अहमद खान, एच. सी. महादेवाप्पा आणि एम. बी. पाटील यांच्या समावेशावर शिवकुमार यांनी आक्षेप घेतला.
मंत्रिपदासाठी अष्ट सूत्रे
-विधान परिषदेतून एकच मंत्री.
-लिंगायत समाजासाठी अधिक मंत्रिपदे.
-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीयांसाठी लॉटरी.
-ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळणार.
-मंत्रिमंडळात एकच महिला आमदार.
-वक्कलिग समाजातील तरुण आमदारांना संधी
-गंभीर आरोप असलेल्या आमदारांना मंत्रिपद नाही
संघर्षात उदासीनता दाखवणाऱ्यांना मंत्रिपद नाही