पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर शहरातील प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन गेले आहे. त्यामुळे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर महापालिकेने आता मनमानी करणाऱ्या हॉटेल व पब वर कारवाईस सुरुवात केली आहे.
या कारवाईत अनधिकृत बांधकामे असलेली 60 ठिकाणे महापालिकेने निश्चित केली असून, त्यापैकी 54 ठिकाणी केलेल्या कारवाईत 54 हजार 300 चौरस फुटांवरील अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, घोरपडी, पुणे रेल्वे स्थानक, विमाननगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रूफटॉप हॉटेल्सचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉटेल्समधील अतिक्रमणांवरही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत हॉटेल्समधील बांधकामे पाडून टाकण्यात आली. पाच विभागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या हॉटेल्स सह छोटी हॉटेल्स, दर्शनी आणि सीमा अंतरातील 44 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय सात रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.