कवितेत परिवर्तनाची शक्ती – प्रा. धनंजय भिसे

कवितेत परिवर्तनाची शक्ती – प्रा. धनंजय भिसे

पिंपरी : कवितेत सामाजिक परिवर्तन करण्याची शक्ती असते. आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीमधील चांगल्या रूढी – परंपरा नाकारण्याची आवश्यकता नाही, असे मत साहित्यिक आणि साहित्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी व्यक्त केले.

कासारवाडी येथे उन्हाचा पारा वाढत असताना शब्दधन काव्यमंच आयोजित ‘प्या ताक, कविता म्हणा झ्याक…!’ या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. भिसे बोलत होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कामगारनेते अरुण गराडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बारणे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक सुरेश कंक उपस्थित होते.

रंगीत नक्षीकाम करून सुशोभित केलेल्या माठातील ताकाची घुसळण करीत मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “कवींना व्यक्त होण्याची संधी मिळावी म्हणून शब्दधन काव्यमंच सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असते. कवींनी स्वतः कविता जगावी अन् त्यातून माणसे जोडावीत!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘प्या ताक, कविता म्हणा झ्याक…!’ या कविसंमेलनात संजय गमे, शोभा जोशी, दत्तू ठोकळे, आत्माराम हारे, डॉ. पी. एस. आगरवाल, शिवाजी शिर्के, जयश्री गुमास्ते, विवेक कुलकर्णी, उमा मोटेगावकर, सुमन दुबे, सुभाष चटणे, जयश्री श्रीखंडे, आय. के. शेख, सुप्रिया लिमये, शामला पंडित, एकनाथ उगले, चारुलता विसपुते, धनाजी घाडगे, बाळकृष्ण अमृतकर, प्रिया दामले, तानाजी एकोंडे, मधुश्री ओव्हाळ, सुहास घुमरे, नीलेश शेंबेकर, फुलवती जगताप या कवींनी सहभाग घेतला. वैविध्यपूर्ण कवितांमधून आयुर्वेदातील ताकाचे गुणधर्म, फायदे यांचे वर्णन करीत कवींनी या पारंपरिक पेयाचे महत्त्व अधोरेखित केले. संगीता जोगदंड आणि मीना करंजावणे यांनी गवळणींची पारंपरिक वेषभूषा परिधान करून मान्यवर, सहभागी कवी आणि सर्व उपस्थितांना सुमधुर ताकाचे वितरण केले.

अशोकमहाराज गोरे, दैवता घोरपडे, नंदकुमार कांबळे, विश्वनाथ वाघमोडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. प्रकाश घोरपडे यांनी सादर केलेल्या पारंपरिक गवळणीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share

Leave a Reply