कामगारांनी केली तब्बल पाऊण कोटींची फसवणूक

पिंपरी – गॅस एजन्सीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी महिलेने सहकार्याची मदत घेत संगनमताने गॅस एजन्सीची तब्बल पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केली. ग्राहकांना नवीन कनेक्शन देणे, रेग्युलेटर देणे, सुरक्षा पाईप लायटरची विक्री केल्याचे पैसे ग्राहकांकडून थेट स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन हे फसवणूक करण्यात आली आहे. बिंग फुटताच डिलिव्हरी बॉय त्याच्या मूळ गावी जोधपुर, राजस्थान येथे पळून गेला आहे. जाताना त्याने एजन्सीमधून 30 गॅस शेगड्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार 20 फेब्रुवारी 2021 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ओवी भारत गॅस एजन्सी,शिंदे वस्ती, रावेत येथे घडला.

 

सीमा संपत निकम (वय 46, रा. राज पार्क, शनी मंदिरामागे, काकडे पार्क, केशवनगर, चिंचवड) आणि गॅस डिलिव्हरी करण्याचे काम करणारा कामगार श्रवणकुमार मोहनराम मांजु – बिष्णोई (मूळ रा. मंडला काला, ता. देचू, जि. जोधपूर, राजस्थान) यांच्या विरोधात निलेश डोके (वय ४५, रा. तानाजी नगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सीमा आणि श्रवणकुमार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 381, 408, 457, 201, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी श्रवणकुमार मोहनराम मांजु हा फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी देण्याचे काम करतो. तर सीमा संपत निकम व दुसरी महिला कर्मचारी या दोघी अकाउंटंट म्हणून काम करत होत्या. सीमा हिने दुसर्‍या कर्मचारी महिलेला आपल्या कटात सामील करून श्रवणकुमार याच्या मदतीने फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीच्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. ते पैसे दोघींनी आपसात वाटून घेतले. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुसर्‍या कर्मचाऱी महिलेने हिने तिच्या वाट्याला आलेले 12 लाख रुपये फिर्यादी यांना रोख स्वरूपात परत केले असल्याचे फिर्यादी डोके यांचे म्हणणे आहे.

 

मात्र सीमा संपत निकम हिने एप्रिल 2021 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दुकानातील वस्तूंच्या विक्रीचे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर ग्राहकांकडून ऑनलाईन स्वरूपात घेऊन तसेच दुकानातील दैनंदिन विक्रीचे रोख स्वरूपातील पैसे दुकानात काम करणाऱ्या वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉयकडे देऊन त्यांच्याकडून स्वतःच्या बँक खात्यावर ऑनलाईन स्वरूपात पैसे जमा करून अपहार केलेले 27 लाख 44 हजार 101 रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.

 

पोलिसांनी सीमा संपत निकम आणि दुसरी महिला कर्मचारी दोघींचे बँक स्टेटमेंट काढले असता त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशयित व्यवहारांची चौकशी केली असता दोघींनी श्रवणकुमार याच्या मदतीने लाखो रुपयांची फसवणूक केल्यास उघड झाले.श्रवणकुमार मोहनराम मांजु याच्या वैयक्तिक बँक खात्यावर तब्बल 47 लाख रुपये गैरव्यवहाराची रक्कम जमा झाली आहे. त्यातील एकही रुपया त्याने फिर्यादींना यांना परत दिला नाही.

 

दरम्यान, आपले फसवणूक प्रकरण उघडकीस येणार असल्याचे समजताच सीमा संपत निकम हिने दुसऱ्या कर्मचारी महिलेच्या मदतीने दुकानातील हिशोबाचे रजिस्टर जाळून पुरावा नष्ट करून त्या बदली दोघींनी हिशोबाचे नवीन रजिस्टर लिहून दुकानामध्ये ठेवले होते. 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्रवणकुमार याने 30 स्टेनलेस स्टीलच्या शेगड्या चोरून शहरातून पळ काढला. त्याने 28 सिलेंडरचे पैसेही एजन्सीत जमा केले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

ओवी भारत गॅस मधील ग्राहकांनी कर्मचारी सीमा संपत निकम हिच्याशी कोणत्याही प्रकारचा गॅसच्या दुकानाशी संबंधित आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन मालक निलेश डोके यांनी ग्राहकांना केले आहे.

Share

Leave a Reply