काय सांगता ! शाळेचा वर्ग २१ वर्षांनी भरला..!
भोसरी – शाळेची घंटा वाजली आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्गात गर्दी केली. निमित्त होते, भोसरी येथील
श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.
हे माजी विद्यार्थी थोडीथोडक्या नव्हे तर तब्बल २१ वर्षांनी एकमेकांना भेटले होते. शाळेतील जुन्या आठवणी, तसेच सेवानिवृत्त झालेल्या आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांची झालेली भेट यामुळे सारे वातावरण भावुक झाले होते. एकाच बेंचवर बसणारे मित्र बऱ्याच कालावधीनंतर एकत्र आल्यामुळे त्यांची गप्पांची छान मैफील जमली होती.
या शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत असून रविवारी (२१ मे ) या माजी विद्यार्थ्यांचा जणू मेळाच भरला होता. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला विसरत नाही. जिथे अभ्यासाचे धडे गिरवून जीवनात यशस्वी झालो. ती पवित्र शाळा, तेथील शिक्षक आणि जिवाभावाची मित्रमंडळी यांची पुन्हा एकदा भेट घडवण्याचा हा सोहळा माजी विद्यार्थ्यांनी केला. थोडी थोडक्या नव्हे तर तब्बल २१ वर्षांनंतर शाळेमध्ये सन २०००-२००१ च्या मॅट्रीक बॅचचा वर्ग पुन्हा एकदा भरला होता. सकाळी १० वाजता धावडेवस्ती येथील शाळॆत सर्वजण जमले. शाळेची घंटा वाजवून सामुहिकरित्या राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांचा हृदय सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू रासकर, रवी रासकर, सपना माळी, गणेश लांडगे, साधना माळी, आशिष ढमाले आदींनी परिश्रम घेतले. तर हे ४२ विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले होते. यानिमित्ताने मुख्याध्यापक अनिल शेलार, अनिल महापुरे, भास्कर शिंदे, आणि गाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले. वैभव वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले.