पिंपरी : दोन दिवसांपुर्वीच पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे खोदकाम चालू असताना एमएनजीएल लाइन फुटली होती. त्यामुळे, तब्बल दीडशे ते दोनशे सोसायट्यांचा गॅस पुरवठा खंडीत झाला होता. आता रस्त्याच्या कामामुळे केबल खराब झाल्यामुळे सांगवीतील रहिवाशांचा १२ तास वीज खंडित झाला होता. त्यामुळे, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना वारंवार मनस्तान सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सांगवीत रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान गुरूवारी रात्रीच्या सुमारास केबल तुटले. मुख्य विजपुरवठा वाहिनी केबल तुटल्याने सांगवीतील मधुबन, शितोळेनगर, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर आदी भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने एक निवेदन जारी केले.
या निवेदनात, रस्त्याच्या कामादरम्यान दोन ११ KV केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा पुर्ववत करण्यास ७ तासाचा अवधी लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे येणाऱ्या तक्रारींमध्ये महावितरणचे अधिकारी गुंतून पडले होते. त्यातच अपुरे कामगार आणि तंत्रज्ञांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात सुमारे १२ तास लागले. त्यामुळे सांगवीतील रहिवाशांचा वीजपुरवठा मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे होती घेण्यात आली आहेत. मात्र, या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीऐवजी तोडफोड जास्तीची दिसून येत आहे. त्यातच केबल, गॅससह आदी लाईन खोदकामादरम्यान खराब होत आहेत. त्याचा मोठा फटका रहिवाशांना बसताना दिसत आहेत. त्यामुळे, पावसाळ्यापुर्वीच गॅस आणि वीजपुरवठा खंडीत १२ – १२ तास खंडीत होत असेल तर पावसाळ्याच काय अवस्था होईल? महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास रहिवाशांनी किती दिवस सहन करायचा? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.