पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल येथील तीव्र उतार व वळणावर वेगात जाणाऱ्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कंटेनर समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारवर पलटी झाल्यामुळे कार अक्षरशः पूर्णपणे दबली गेली. या विचित्र भीषण अपघातात कारमधील दोघां नवरा बायकोचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झाला. हे सर्व पर्यटनासाठी अलिबागला गेले होते. अलिबाग वरून घरी येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. याप्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय रामदास चौधरी (वय-५५) कविता दत्तात्रय चौधरी (वय-४६, दोघेही रा. निमडाळे, धुळे सध्या रा. देवकण पिंपरी, जळगाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पती व पत्नींचे नाव आहे. तसेच जखमींमध्ये भूमिका दत्तात्रय चौधरी (वय- १६), मितांश दत्तात्रय चौधरी (वय-९, दोघेही रा. निमडाळे, धुळे, सध्या रा. देवकण पिंपरी, जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय-४०), जान्हवी योगेश चौधरी (वय-३१), दिपांक्षा योगेश चौधरी (वय-९), जिज्ञासा योगेश चौधरी (वय- दीड वर्ष, चौघेही रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, पुणे) यांचा समावेश आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी परिसरातील हे सदस्य त्यांच्या स्विफ्ट कारने (क्रमांक -एमएच-१४/बीएक्स-१६०५) अलिबाग व कोकणात फिरायला गेले होते. सोमवारी रात्री अलिबाग वरून घरी येताना जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यात खंडाळा घाटातील बॅटरी हिल येथे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक-एमएच-१४/एफटी-१४४५) चालकाचे येथील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर स्विफ्ट कारवर पलटी होऊन कार पूर्णपणे दबली गेली. या विचित्र अपघातात दोघां पती व पत्नीचा जागीच मृत्यू असुन, त्यांच्या दोन मुलांसह चार नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या परिवारासह त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघातानंतर कंटेनर चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग व लोणावळा शहर पोलिस, खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक, देवदूत आपत्कालीन पथक यांच्यासह खंडाळा व बॅटरी हिल परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कंटेनर क्रेन व पुलरच्या सहाय्याने बाजूला करत त्याच्याखाली अडकलेली कार व कार मधील नागरिकांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी खंडाळ्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करून तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.