पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
आज मी शापमुक्त जाहले… ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा…राम जन्मला गं सखे…स्वयंवर झाले सीतेचे असे ह्रदयाचा ठाव घेणारे शब्द आपल्या भावपूर्ण वाणीतून सादर करीत ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी श्रवणीय आणि संस्मरणीय गीतरामायण केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सवाचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात केले आहे.महोत्सवात प्रख्यात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग.दि. माडगूळकर रचित आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर केलेली कलाकृती त्यांनी सादर केली.
वाल्मिकी रामायणातील श्लोक ‘स्वयें श्रीराम प्रभू ऐकती’ हा श्लोक सादर केला. ‘दशरथा घे हे पायसदान’ ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, श्रीरामाचे कौडकौतुक करणारे ‘सावळा गं रामचंद्र’…’ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा’ ही गीतरामायणातील गीते सुश्राव्य आवाजात सादर केली. केवळ गाणी नाही तर त्यामागील आठवणी देखील श्रीधर फडके यांनी सांगितल्या.
13 एप्रिल पर्यंत हा दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत संगीत महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.