गुगल सांगणार कुठे आहे जवळचं ईव्ही चार्जिंग स्टेशन

मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र

देशात सध्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळेच ईव्ही वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी गुगल मॅप्स आता एक खास फीचर लाँच करणार आहे. यामुळे आता यूजर्सना जवळच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचं लोकेशन मॅप्सवर मिळणार आहे.गुगल मॅप्समध्ये एआयच्या मदतीने हे नवीन फीचर देण्यात येणार आहे. यासाठी यूजर रिव्ह्यूजचा देखील फायदा होणार आहे. या डेटामुळे यूजर्सना केवळ चार्जिंग स्टेशनची माहितीच नाही, तर तिथे पोहोचण्यासाठी अगदी अचूक दिशा देखील मिळणार आहेत.

यूजर्सचीच मदत

गुगल मॅप्सवर दररोज कोट्यवधी यूजर्स आपले रिव्ह्यू देत असतात. यामुळे गुगलकडे माहितीचा भंडार आहे. यामध्ये पेट्रोल पंप, सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशनबाबत देखील माहिती असते. याच माहितीचा वापर करून गुगल इतर यूजर्सना अधिक चांगली सेवा देणार आहे. एखाद्या चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, तिथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा, चार्जिंगसाठी कोणती पिन उपलब्ध आहे, किती वेळ लागतो? अशा सर्व गोष्टींची माहिती गुगल मॅप्सवर मिळेल.

लाँग ट्रिप्सना होणार फायदा

गुगल मॅप्सच्या या फीचरमुळे आता लांब पल्ल्याच्या प्रवासाचं नियोजन करणं सोपं जाणार आहे. इलेक्ट्रिक कार वापरणारे कित्येक लोक, इच्छा असूनही चार्जिंग स्टेशनची माहिती नसल्यामुळे लांबपर्यंत कार नेणं टाळतात. मात्र आता गुगलवर आधीपासूनच कुठे-कसे चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत याची माहिती मिळाल्यामुळे लाँग ट्रिप्सना फायदा होणार आहे.

ईव्ही हॉटेल

केवळ चार्जिंग स्टेशनचीच नाही, तर गुगल मॅप्स आता तुम्हाला अशा हॉटेलची माहिती देखील देऊ शकेल, जिथे ईव्ही-चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासाचं नियोजन करणं अगदी सोपं होणार आहे. यासोबतच कारमध्ये इनबिल्ट मॅप्सना देखील ईव्ही चार्जिंग स्टेशन लोकेट करण्याची सुविधा देण्याबद्दल गुगलचा विचार सुरू आहे. एकूणच, इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन; त्यांच्या सोयीसाठी गुगल मोठ्या प्रमाणात नवे फीचर्स लाँच करत आहे

Share

Leave a Reply