पिंपरी – पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर चिंचवड पुलावर वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी हाईट बॅरिगेट्स लावलेले आहेत त्यानुसार जड वाहनांना पुलावर बंदी करण्यात आली आहे. मात्र या बॅरीगेटसमुळे पीएमपीएमएल बसेस व इतर वाहनांना मोठा वळसा घेऊन चिंचवड गावात जावे लागत आहे जे की गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे हे बॅरीगेटस काढावेत अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतची माहिती रेल्वे मंत्री, पुणे विभागीय नियंत्रक, स्थानिक आमदार, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड, चिंचवड वाहतूक विभाग यांना देण्यात येत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने चिंचवड येथील चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणार्या सर्व बसेस (पीएमपीएमएल, बससह), जड व इतर वाहनांना पुलावरून लोकमान्य हॉस्पिटल व चिंचवडगावाकडे जाण्यासाठी बंदी करण्यात येत असून पर्यायी मार्ग महावीर चौक-खंडोबा माळ, आकुर्डी – भक्ती शक्ती, निगडी येथून बिजलीनगर मार्गे रिव्हर व्ह्यु चौक मार्गे इच्छित स्थळी जातील, अशी नोटीस लावून जाण्यासाठी बंदी असलेले चित्र फलक ही पुलालगत लावण्यात आले. रस्त्यापासून अंदाजे 6-8 फुटाचे काळ्या, पिवळ्या रंगाचे रंगरंगोटी करून लोखंडी हाईट बॅरिअर मजबुत लोखंडाचे लावण्यात आले. मधोमध रात्रीच्या वेळी वाहतूक चालकाला दिसावे म्हणून लाल रंगाचा दिवा देखील बसविण्यात आला होता. गेल्या महिन्यात काही अवजड वाहने हाईट बॅरिअर ला धडकून लोखंडी बॅरिअर वाकडे झाले होते. क्रेनच्या साह्याने हटविल्यामुळे पुन्हा सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सुरळीत चालू होती. परंतु, गेल्या आठवड्यात पुन्हा नव्याने हाईट बॅरिअर बसविण्यात आले. धोकादायक दिवा दोन दिवसांपूर्वीच बंद स्थितीत दिसून आला. संध्याकाळच्या वेळेला वाहन चालकांना आकुर्डीकडे वळावे, यासाठी वाहतूक विभागाचा कर्मचारी दिसून आला होता. रविवारी रात्री प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो टॅ्रव्हलर हाईट बॅरिअर मध्ये घुसून ट्रॅव्हलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, असे वारंवार होत राहिल्यास मानवी जिवीताला आता हानी पोहचण्याची दाट शक्यता असून त्या नोटीस फलकावर पुलावरून वाहतूक बंद करण्याचे कोणतेच सबळ कारण लिहीण्यात आले नाही. चिंचवड उड्डाण पुल हा चिंचवडगाव, हिंजवडी आयटी पार्क, टाटा मोटर्स, एसके कंपनी, एल्प्रो कंपनीच्या आवारातील आयटी पार्क, ताथवडे, थेरगाव, डांगे चौक, भुमकर चौकातून पुणे-बंगलोर बायपास हायवे कडे चाकण, तळवडे, पिंपरी, चिंचवड एमआयडीसी, विविध कंपन्यांचे कामगार वाहतूक करणारे बसेस आदींना चिंचवड स्टेशन येथील उड्डाण पुल सोयीचे असल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत गेली अनेक वर्षे सुरू आहे. आता पीएमपीएमएल बस सेवा बंद झाल्यामुळे मनपा चिंचवडगाव, भोसरी चिंचवडगाव, आळंदी चिंचवडगाव, पुणे स्टेशन चिंचवडगाव, निगडी कात्रज बायपास पीएमपीएमएल सेवा बंद झाल्यामुळे या परिसरातील पारिजात बन, गावडे कॉलनी, सुदर्शन नगर, गोलांडे ईस्टेट, भोईर कॉलनी, श्रीधर नगर, देवधर सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, तानाजी नगर या परिसरातील शेकडो रहिवासी पीएमपीएमएल बसद्वारे नियमित प्रवास करतात, त्यांची गैरसोय होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका, वाहतूक विभाग, रेल्वे विभाग यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी येथील पाहणी करून एकेरी मार्गावर वाहतूक ये-जा ठेवत आज होणारी गैरसोय दूर करावी. पुल कमकुवत असेल तर, त्याचे काम युद्ध पातळीवर करून वाहतूक करावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संगीता जाधव, सुरज आसदकर, मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, नंदु भोगले, हार्दिक जानी, नयन तन्ना वतीने मागणी करण्यात येत आहे.