चिखलीत भर दिवसा गोळ्या घालून तरुणाचा खून
पिंपरी – भर दिवसा गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना आज (सोमवारी, दि. २२) दुपारी चिखली गाव येथे घडली.
सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस हद्दीत गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. शिरगाव सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.
त्यांनतर पुन्हा एक खुनाची गंभीर घटना समोर आली आहे. चिखली गाव येथे सोन्या तापकीर याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. ही घटना भर दिवसा रहदारीच्या मार्गावर घडली. गंभीर जखमी झालेल्या तापकीर याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.