जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित ‘समता पंधरवडा’ निमित्त सन 2023-24 बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नुकत्याच बारावीच्या परीक्षा झाल्या असून एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, पी.एचडी, बीएस्सी अॅग्री, बी-फार्म, बीएस्सी नर्सिंग आदी व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थांना सांविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टी च्या https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत जिल्हा जात पडताळणी समिती पुणे -3 विश्रांतवाडी येरवडा येथील कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी.

अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आदी नियमानुसार लागणाऱ्या पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ वेळेत सादर करावा. अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे.

जात वैधता प्रमाणपत्राकरिता अगोदर अर्ज सादर केलेल्या व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाईल/ ई-मेल द्वारे संदेश पाठविले आहेत. अशा अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन व आपली त्रुटीची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यलयात उपस्थित रहावे. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश डोके, उपायुक्त तथा सदस्य डॉ.दीपक खरात आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संतोष जाधव यांनी केले आहे.

Share

Leave a Reply