पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले तोरणा गडावर असणाऱ्या तटबंदीखाली तीन शिवकालीन गुहा सापडल्या आहेत. त्यामुळे गड दुर्ग प्रेमींसाठी हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. ज्या ठिकाणी गुहा सापडल्या आहेत. त्या ठिकाणी फक्त पायवाट आहे. तोरणा गडाच्या मेट पिलारे मार्गावर या गुहा सापडल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण येथूनच बांधले. या गडाची उंची आणि विस्तार पाहता तोरणा किल्ल्याची विशेष ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यापैकी तोरणागड आणि राजगड यांना इतिहासात विशेष महत्वाचे स्थान आहे.या किल्ल्यांवर फिरण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. यामध्ये पर्यटक, दुर्ग अभ्यासक,ट्रेकर्स,शिवप्रेमी, किल्ल्यांना भेटी देतात.
या किल्ल्यांवर पुरातन काळातील तोफेचे गोळे, शिवकालीन नाणी सापडणे किंवा गुप्त भुयारी मार्ग हे अनेक वेळा सापडले आहेत. या गडाच्या मेटपिलावरे मार्गावरील श्री कुंबळजाई मंदिर मार्गे अडगळीच्या झाडाझुडुपांतुन पढेर दांडावर जात असताना स्थानिक नागरिकांना या गुहा दिसल्या आहेत.
या भागात आदिवासी लोक अधिक रहात असल्याने ते मोठ्या प्रमाणावर भटकंती करत असतात. स्थानिक नागरिक पायवाटेने डोंगरावर फिरत असतात. त्यांना फिरताना या ठिकाणी गुहा दिसल्या आहेत. सुरुवातीला येथे झाडी असल्याने ती दिसून आली नव्हती. मात्र गुहेच्या तोंडाशी असलेली झुडपे, माती काढली तेव्हा या प्रशस्त आकाराची गुहा आढळली, अशी माहिती या भागाचे सरपंच हनुमंत पिलावरे यांनी दिली आहे.