त्र्यंबकेश्वरमधील प्रकारावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे असे मत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात सर्व जातीपातीची लोकं राहतात. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कुठलेही तणाव पूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेच्या चौकशीसाठी एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटी गेल्या वर्षी घडलेल्या अशाच घटनेचीही चौकशी करेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
झालं काय होतं?
त्र्यंबकेश्वरमध्ये उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आलं.
तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे.