चंदिगढ : सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूतकिंमतीने खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूतकिंमतीने खरेदी सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने १,६९,२१७.४५ मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुस-या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या देशात गव्हाची काढणी जोरात सुरू आहे. त्याचबरोबर मंडईंमध्येही गहू खरेदी सुरु झाली आहे. मात्र, देशात फक्त गहूच खरेदी केला जातो असे नाही. एमएसपीवर इतर पिकांची खरेदीही सुरू करण्यात आली आहे. आता देशात एमएसपीवर मोहरी खरेदी केली जात आहे. मोहरी बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांनंतर खुल्या बाजारातील भाव एमएसपीपेक्षा कमी आहेत. त्यामुळं शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर मोहरीची विक्री करत आहेत. सरकार शेतक-यांना तात्काळ पैसेही दिले जात आहेत.
१.६९ लाख मेट्रिक टन मोहरीची खरेदी
देशात वेगानं मोहरीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत नाफेडने १,६९,२१७.४५ मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. आकडेवारीनुसार, देशातील ८४९१४ शेतक-यांनी सरकारला एमएसपीवर मोहरी विकली आहे. याचे शेतक-यांना ९२२.२४ कोटी रुपये मिळाले आहेत. मोहरी खरेदीत हरियाणा हे राज्य अव्वल आहे.
हरियाणात मोठ्या प्रमाणावर मोहरीची खरेदी
राजस्थानमध्ये मोहरीचे सर्वाधिक उत्पादन होते. दुस-या क्रमांकावर हरियाणा आहे. देशातील १३.५ टक्के मोहरीचे उत्पादन हरियाणात होते. नाफेडच्या म्हणण्यानुसार, हरियाणामध्ये २० मार्चपासून ५४४० रुपये प्रति क्विंटल एमएसपी दराने मोहरीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत १३९२२६.३८ मेट्रिक टन मोहरीची खरेदी झाली आहे. शेतक-यांच्या खात्यावर ७५८.७८ कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. तेलबिया पिकांपैकी २६ टक्के मोहरीचा समावेश होतो. राजस्थान हे देशातील ४२ टक्के मोहरीचे उत्पादन करणारे राज्य आहे. पण जेवढे उत्पन्न येथे आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत ४७०८ मेट्रिक टन मोहरीची खरेदी झाली आहे.