निवडणूक काळात पीएमपीएमएलला एक कोटी 57 लाखांचे उत्पन्न

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक काळात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कडून पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 931 बस पुरवण्यात आल्या. यामधून पीएमपीएमएलला एक कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या बसमधून निवडणूक साहित्य, निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मतपेट्यांची वाहतूक करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात येणाऱ्या चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. 7 मे रोजी बारामती तर 13 मे रोजी मावळ, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपेट्या आणि निवडणुकीशी संबंधी लोकांची ने आण करण्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार पीएमपीएमएलकडे आवश्यक बसेसची मागणी करतात. त्यानुसार पीएमपीएमएलकडून बस पुरवल्या जातात.

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक नियोजन अधिकाऱ्यांनी 931 बसेसची मागणी केली होती. त्यानुसार पीएमपीएमएलच्या 931 बस पुरवण्यात आल्या. पुणे लोकसभेसाठी 503 बस, बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी 113 बस, शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी, हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी 140 बस, मावळ मतदारसंघातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात 175 बस सोडण्यात आल्या होत्या. यातून पीएमपीएमएलला एक कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दोन दिवस प्रवाशांचे हाल

मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान साहित्य आणि लोकांना नेण्यासाठी सकाळच्या सत्रात बस सोडण्यात आल्या. तर मतदानाच्या दिवशी दुपारनंतर निवडणुकीच्या कामासाठी बस सोडल्या गेल्या. त्यामुळे दोन दिवस एक सत्रात अनेक मार्गांवरील बस बंद होत्या. बस बंद असल्याने दोन दिवस प्रवाशांचे मोठे हाल झाले.

Share

Leave a Reply