पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव

पुणे – आषाढी पालखी सोहळा देहू, आळंदी ते पंढरपूर असा दिनांक 10 जून ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे. सोहळ्यासोबत सुमारे 5 ते 6 लाख वारकरी पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवरून सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखी मार्गाची तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणांची माहिती घेऊन वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा कालावधीत पुणे जिल्ह्यातल्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये वारकऱ्यांवर उपचारासाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवल्या जाणार आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आजार, अथवा अपघात झाला तर तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बंधनकारक आहेत.

हा सोहळा देहू, आळंदीपासून हवेली, पुरंदर, बारामती तसंच इंदापूर तालुक्यांतून पुढे सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीतून पंढरपूरकडे रवाना होतो. याची जबाबदारी आरोग्य उपसंचालक, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे असणार आहे.

Share

Leave a Reply