पिंपरी : शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लहान-मोठे असे १४८ नाले आहेत. शंभर किलोमीटर अंतराच्या या नाल्यांची ३१ मे पूर्वी यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही काही क्षेत्रीय कार्यालयातील नालेसफाईच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. नालेसाफसफाई अद्याप कागदावरच आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलो मीटर अंतराचे १४८ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार आणि टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद आणि उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर आणि दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले स्वच्छ केले जातात. त्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी २२ मार्चला नालेसफाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यास काम करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. परंतु, अद्यापही नालेसफाईला सुरुवात झाली नाही.
नालेसफाईच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिली असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनच्या साहाय्याने सफाई केली जाईल. मशिन जात नाही, अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येईल. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे छायाचित्रे घेतली जाणार आहेत, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.