पुण्यात आज लाक्षणीक हेल्मेट दिवस
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (बुधवारी) लाक्षणीक हेल्मेट दिवससाजरा कऱण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज शहरात दुचाकीस्वार सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात येताना आणि कार्यालयातून घरी परत जाताना हेल्मेट परिधान करणार आहेत.
हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी, कर्मचाऱ्यांची हेल्मेट परिधान करण्याची ही कृती ही जनतेस मार्गदर्शक ठरावी आणि प्रत्येकामध्ये स्वतःबरोबरच सहप्रवाशाच्या सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या लाक्षणिक हेल्मेट दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
देशात रोज सुमारे 411 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे 80 टक्के व्यक्ती या दुचाकीचालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांपुढील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
यावेळी दुचाकीचा वापर करणारे सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी,निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, महामंडळे, महानगरपालिकांमधील कर्मचारी, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांमधील कर्मचारीयांना हेल्मेट घालाणे अनिवार्य केले आहे.