पुण्यात घडली ही दुदैवी घटना; वाचा का झाला महिलेचा मृत्यू
पुणे : कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करत असताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही घटना घडली. रेखा अर्जुन हिलाळ (वय 28) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे यांनी केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसात टाकळी हाजी केंद्रातील 42 तर कवठे केंद्रातील 38 अशा 80 महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या होत्या. यात रेखा हिलाल या देखील होत्या. कवठे यमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या आल्या होत्या. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑपरेशन टेबलवर घेण्यात आले. मात्र ऑपरेशन सुरू असताना त्या घाबरल्या आणि त्यांना त्रास होऊ लागल्या. यावेळी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी शिरूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर प्रियांका घुगे यांनी दिली.
रेखा हिलाळ यांना दोन मुले आहेत. अशाप्रकारे त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर आरोग्य खात्याच्या सेवेबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.