पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
आलिशान पोर्शे कार ताशी १५० ते १६० किलोमीटर या वेगाने चालवत मद्यधुंद अवस्थेत दोन आयटी अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीकडे आता चौकशी केली जाणार आहे. यासोबतच त्याने चालवलेल्या पोर्शे कारमधील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासलले जाणारआहे.
आधुनिक बनावटीच्या गाड्यांमध्ये पुढे आणि मागे कॅमेरे असतात. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील हालचाली चित्रित होत असतात. त्यामुळे ज्यावेळी ही कार रस्त्यावरून भरधाव वेगात धावत होती त्यावेळी नेमके काय घडले, याबाबत तपास केला जाणार आहे. जर गाडीत कॅमेरा असेल आणि त्यामध्ये चित्रीकरण झाले असेल तर ते ताब्यात घेतले जाणार आहे. त्यामधून अपघाताविषयी महत्वपूर्ण माहिती मिळू शकणार असल्याचे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
आरोपी अल्पवयीन लगा शनिवारी (दि. २०) रात्री त्याच्या घरामधूनच गाडी घेऊन निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत गाडीचा चालकदेखील सोबत होता. रविवारी (दि. २१) पहाटे अडीचच्या सुमारास अपघात घडल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र तसेच चालकदेखील उपस्थित होता. पोलिसांनी या सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. ‘‘आरोपीचे वडील विशाल अगरवाल याने अल्पवयीन मुलगा पार्टीसाठी जात असताना चालकाला सोंबत जाण्यास सांगितले होते. तसेच, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, असे अगरवालने सांगितल्याचा जबाब चालकाने दिला आहे,’’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘कोझी’ पबमधून बाहेर पडल्यानंतर सर्वजण ‘ब्लॅक’ पबमध्ये गेले. तिथपर्यंत या मुलानेच गाडी चालवली होती. तसेच, ‘ब्लॅक’मधून बाहेर पडल्यानंतर दोन मित्र आणि चालकाला घेऊन आरोपी अल्पवयीन मुलगा घराच्या दिशेने निघाला होता. यावेळीही गाडी चालवत असताना त्याने वेगाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यातच हा अपघात घडला. हा अपघात नेमका कसा घडला? मोटारसायकलला धडक नेमकी कशी बसली? त्यानंतर पोर्शे कार पुढे जाऊन अन्य वाहनांना जाऊन कशी धडकली? गाडीमधील एयर बॅग उघडल्या आणि या सर्वांचा जीव वाचला, हा सर्व घटनाक्रम गाडीमधील रेकॉर्डिंग मिळाल्यास उघड होऊ शकतो.
अल्पवयीन आरोपीच्या मोबाईलचाही तपास
आरोपी अल्पवयीन मुलाचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचा तपास केला जाणार आहे. या मोबाईलमधील फोटो, व्हीडीओ तसेच व्हॉटसअॅप चॅटिंगही तपासले जाणार आहे. जेणेकरून त्यामधून आणखी महत्वपूर्ण माहिती समोर येऊ शकेल. तसेच, त्याचे कॉल डिटेल्सदेखील तपासले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.