पोलीस दलात कोणाची बढती आणि कोणाची बदली
पिंपरी – सत्ता संघर्षाच्या काळात रखडलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (दि. 22) बदल्या आणि बढत्या जाहीर केल्या. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. यामध्ये राज्यातील 139 पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर 143 जणांना पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली आहे. तर चाकण उपविभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली झाली आहे. वाकड उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर दिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अक्कलकोट उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर तसेच गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब दिनकर कोपनर यांची पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. त्यांची बढतीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात पदस्थापना करण्यात आली आहे. सतीश कृष्णराव कसबे यांची देखील पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील 143 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील विठ्ठल खंडूजी कुबडे यांची पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातच पदस्थापना करण्यात आली. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास जयसिंग इंगवले यांची पोलीस उपअधीक्षक औसा, जि. लातूर येथे बढतीने बदली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष मधुकरराव कल्याणकर यांची पोलीस उपअधीक्षक अहमदपूर, जि. लातूर येथे बढतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळाली बढती
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव हे मागील काही महिन्यांपूर्वी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांचे नाव बढती मिळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत होते. वेळीच बदल्या झाल्या असत्या तर त्यांना पोलीस उपाधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर काम करता आले असते. मात्र या बढत्यांना विलंब झाला. दरम्यान रावसाहेब जाधव हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या बडतीचे आदेश मिळाले आहेत.