पोस्टात बदलून मिळणार नाहीत दोन हजारांच्या नोटा

 मागील आठवड्यात रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या नोटा बँकेमध्ये जमा करण्यासाठी मुदत दिली आहे. दरम्यान काही नागरिक पोस्टमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र पोस्ट कार्यालयामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार नाहीत, असे पोस्टाकडून सांगण्यात आले आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र, चलनाची गरज तातडीने भागवण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. चलनात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात असल्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा कमी करण्यात येत आहेत.
नोटा बदलण्यासाठी दिलेल्या 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत दोन हजार रुपयांच्या बहुतांश नोटा सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 30 सप्टेंबरपर्यंत परत येणाऱ्या नोटांच्या संख्येवरून या नोटेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं पालन करत असून त्यानुसार यापूर्वी वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून घेऊन नव्या नोटा जारी केल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे हा चलन व्यवस्थापनचा भाग असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.
आपल्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकांसह आता पोस्ट कार्यालयाकडे देखील रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोस्ट कार्यालयातून दोन हजारांच्या नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत, असे पोस्टाकडून सांगण्यात आले आहे.
पोस्टात असलेल्या खात्यावर चलनाद्वारे दोन हजारांच्या नोटा जमा करता येतील. मात्र दोन हजारांच्या नोटा घेऊन त्या बदल्यात इतर नोटा पोस्टाकडून दिल्या जाणार नाहीत. 17 सप्टेंबर पर्यंत पोस्टात चलनाद्वारे दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत.
Share

Leave a Reply