प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून घ्या विमा संरक्षण
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी एक अपघात विमा योजना आहे. या योजनेत सहभागींना केवळ 20 रुपयांमध्ये 1 लाख ते 2 लाखापर्यंतची भरपाई मिळणार आहे.
या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी बँका यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. दोन्ही डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी/ दोन्ही हात किवा दोन्ही पाय निकामी होणे/एक डोळा आणि एक हात किवा पाय निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये विमा संरक्षण मिळेल. एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये मिळतील.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या ठळक बाबी –
एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे.
विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
18 ते 70 वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे.
योजनेचा कालावधी दर वर्षी 1 जून ते 31 मे असा राहील.
विमा हप्ता 20 रुपये प्रती वर्ष आहे.
विमा धारकाने वय वर्ष 70 पूर्ण केल्यावर अथवा बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर अथवा बँक बंद पडली तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल.
विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
तांत्रिक अडचणीमुळे संपुष्ठात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.