बारावीच्या निकालात पुणे विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. 21) बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. त्यात कोकण विभागाने पहिला (97.51 टक्के) क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर (94.71 टक्के) नाशिक तर तिसऱ्या (94.44 टक्के) क्रमांकावर पुणे विभाग आहे.

यावर्षी बारावीची परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत पार पडली. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील 97.51 टक्के सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा 91.95 टक्के लागला आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.44 टक्के आहे. यंदा मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुणे विभागात दोन लाख 44 हजार 378 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील दोन लाख 42 हजार 814 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून दोन लाख 29 हजार 329 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात बारावीच्या परीक्षेत नऊ हजार 781 मुले तर तीन हजार 704 मुली नापास झाल्या आहेत.
नऊ विभागीय मंडळांचा निकाल –

पुणे – 94.44
नागपूर – 92.12
छत्रपती संभाजीनगर – 94.08
मुंबई – 91.95
कोल्हापूर – 94.20
अमरावती – 93.00
नाशिक – 94.71
लातूर – 92.36
कोकण – 97.51

Share

Leave a Reply