बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठविली
पिंपरी -देशातील शेतकरी, बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निकाल शेतकरी, भूमिपूत्र आणि गाडामालकांसह बळीराजाला समर्पित आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. वर्षभरापूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर अंमित सुनावणी सुरू होती. काहीअंशी जिंकलेला हा न्यायालयीन लढा पूर्णत जिंकण्यासाठी देशभरातील शेतकरी, बैलगाडा मालकांच्या नजरा या निकालाकडे लागल्या होत्या.
दरम्यान, महाराष्ट्रातून बैलगाडा शर्यतीसाठी जनआंदोलन उभारण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत विधिमंडळात कायदा तयार केला होता. तसेच, बैलांच्या पळण्याच्या क्षेमतेबाबत ‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स’ हा अहवाल तयार करण्यासाठी समितीची नेमणूक केली होती. तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. राज्य सरकारच्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि महाराष्ट्र राज्य सरकार अशा दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात होत्या. महाराष्ट्र सरकारच्या वतीने तज्ञ वकीलांची नियुक्ती केली होती. तसेच, बैलगाडा संघटनांच्या वकीलांचा मोठा खर्चही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वैयक्तीक करण्याची भूमिका घेतली होती. गेल्या ११ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर सर्वोच्च न्यालयात बैलगाडा शर्यतीवरील बंदी पूर्णत: काढण्यात आली असून, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ कायमस्वरुपी सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयात हा लढा सुरू असताना अनेक लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आणि सहकार्य केले आहे. राज्यातील बळीराजा आज खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करणार आहे. बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नाही, तर आपली महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या लढ्यात सर्वाधिक योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व पदाधिकारी, बैलगाडा शौकीन आणि गाडाप्रेमींचे मी अभिनंदन करतो. या पुढील काळात हा महाराष्ट्राचा उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करुया आणि शेती-माती- संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात.
-महेश लांडगे,
शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंरी-चिंचवड.