भीमा नदीत दोन मुले बुडाली
पुणे – पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भीमा नदीत दोन मुले बुडाल्याची घटना घडली. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप दोघांचे मृतदेह सापडले नाहीत. ही घटना रविवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास घडली.
अनुराग विजय मंडले (वय १६) आणि गौरव स्वामी (वय १६) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्ती येथील राहणारे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग आणि गौरव रविवारी दुपारच्या सुमारास भीमा नदीत पोहण्यासाठी गेले होते.
- मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांच्यासोबत पोहणाऱ्या मुली आणि इतर लोकांनी दोघेही बुडाल्याचे पाहिले. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा देखील केला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यामुळे अद्यापही दोन्ही मुलांचे मृतदेह सापडलेले नाहीत.