भोसरीमधून दोन किलो गांजा जप्त
पिंपरी – भोसरी मधील लांडगे नगर येथून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
अमर निवृत्ती जेधे (वय 28), एक महिला (वय 40, दोघे रा. लांडगेनगर, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगेनगर येथे दोघांनी विक्रीसाठी गांजा बाळगला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन किलो गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख 86 हजार 25 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.