पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पुणे महापालिकेच्या गेटवर उपअभियंत्याला ओळखपत्राबाबत चौकशी केल्याने त्यांनी तीन तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली असल्याची घटना आज (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे महापालिकेने 50 कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर या तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. आज दुपारी उपअभियंता महापालिकेत आलेला असताना एका तृतीय पंथी सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यावर शिविगाळ करत मी 30 वर्ष झालो महापालिकेत आहे, मला ओळखत नाहीस का असे म्हणत मारहाण केली. तिच्या मदतीसाठी आलेल्या आणखी दोघींनाही मारले.
याच उपअभियंत्याने वैकुंठ स्मशानभूमीत महापालिकेतील एका विभाग प्रमुखाला मारहाण केली होती, त्याप्रकरणात त्यास निलंबित केले होते. जानेवारी महिन्यात पुन्हा सेवेत घेण्यात आल्यानंतर आता तीन तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे.अद्याप याबाबात पोलिसांकडे कोणती तक्रार दाखल केली नसून यासंदर्भात उपायुक्त प्रतिभा पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करावा, संबंधित उपअभियंत्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सुरक्षा रक्षकांना दिले असल्याचे विटकर यांनी सांगितले.