मावळमध्ये पवना धरणग्रस्त आक्रमक; पवना धरणावर काढला मोर्चा

मावळ – पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढत पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद केला. धरणग्रस्त शेतकरी आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पवना धरणावर जाऊन मोर्चा काढला. गेल्या कित्येक वर्षापासून पवनाधरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याच मागण्या घेऊन आज शेतकऱ्यांसह राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला. अखेर पुण्याचे पालकमंत्री यांनी फोनद्वारे धरणग्रस्त मोर्चेकरांशी संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचे गेल्या कित्येक वर्षापासून विविध मागण्या आहेत. त्या अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी पवना बाजारपेठेसह पवना धरणावर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिस आणि मोर्चेकरी आमने-सामने आल्याचे चित्र होतं. परंतु, आमदार सुनील शेळके यांनी पोलिसांचा विरोध झुगारून मोर्चेकरांना वाट करून दिली. काही काळ पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा देखील बंद केला. मोर्चेकरांनी पवना धरणावरच ठिया मांडत आंदोलन सुरू ठेवले. अखेर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनद्वारे धरणग्रस्तांची संवाद साधला येणाऱ्या 19 तारखेला धरणग्रस्तांची बैठक लावली असून यातून तोडगा काढण्याचा आश्वासन दिलं, मगच धरणग्रस्तांनी या आंदोलन मागे घेतल आहे. परंतु 19 मे रोजी होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Share

Leave a Reply