मुंबई : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचा तांडा इथं काल सेप्टिक टँकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही मदत सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत ट्विट करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले”
दुर्घटना नेमकी काय?
गुरुवारी, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भाऊचा तांडा इथं शेतातील एका घरातील सेप्टिक टँकमधील मैला साफ करण्यासाठी सहा कामगार दुपारी तीन वाजता सेफ्टीटँकमध्ये उतरले. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचं काम सुरु होतं, पण यातील वायूमुळं पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर अवस्थेत होता. त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू पावलेले पाचही लोक एकाच कुटुंबातील असल्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
मृत्यू झालेले मजूर
1) शेख सादेक (वय 45)
2) शेख सादेकचा मुलगा _शेख शाहरुख (वय 19)
3) शेख सादेकचा जावई _शेख जुनेद (वय 29)
4) शेख नवीद (वय 25)
5) शेख नविदचा चुलत भाऊ _शेख फिरोज (वय19)