पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या व्यंगचित्रातून ते सामाजिक आणि राजकीय फटकेबाजी करत असतात. अशीच फटकेबाजी त्यांनी आज पुण्यात देखील केली. राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्याच्या हस्ते आज पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याच्याकडे उपस्थित मान्यवरांनी व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी डोळ्यासमोर ठेवत अजित पवारांचे व्यंगचित्र काढले. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या मिश्किल टिपमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय गरड, कार्टुनिस्ट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत या वेळी उपस्थित होते.
ठाकरे यांनी अवघ्या काही मिनिटांत अजित पवार यांचे व्यंगचित्र साकारले. सध्या राज्यात जे सुरू आहे ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढतो असे म्हणत त्यांनी हातात पेन्सिल धरली आणि चार मिनिटांत पवार यांचे चित्र काढले. दरम्यान, चित्र काढल्यावर राज ठाकरे यांनी मिश्किल पणे “आता गप्पा बसा”, असे म्हटले. त्याच्या या टिप्पणीमुळे उपस्थितांमद्धे हशा पिकला.