रत्नागिरी -बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन. आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. ते शनिवारी राजापूरच्या सोलगाव येथील रिफायनरी विरोधक ग्रामस्थांना भेटले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी या ग्रामस्थांशी संवाद साधला. सोलगाव-बारसू रिफायनरीविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुम्ही काळजी करु नका. कोकणात लोकांचे मुडदे पाडून मी विकास होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.