लक्ष्याचा लेक रंगभूमीवर

‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या लेकानं अभिनय बेर्डेनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. सिनेविश्वात आपला जम बसवल्यावर आता अभिनयचं लक्ष आता नाटकाकडे लागलं आहे. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाच्या माध्यमातून तो आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणारआहे.

‘तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमानं आणि आई-बाबांच्या आशीर्वादानं आज नाट्यविश्वात पहिलं पाऊल टाकतोय! ‘आज्जीबाई जोरात!’ हे माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक आहे. सध्या आमच्या तालमी जोरदार सुरू असून महिनाखेरीस आम्ही मायबाप रसिकांच्या भेटीस येतोय’, अशा आशयाची पोस्ट त्यानं केली आहे. क्षितिज पटवर्धन या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन करतोय. महाबालनाट्य असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात अभिनयसह जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोलेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आणखी एक मोठं नाव या नाटकात असणार असल्याचं कळतंय. तसंच या नाटकात एकूण ८ कलाकार आणि ११ नर्तक असणार आहेत.

दरम्यान, लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी आनंद देणारी असल्याचं क्षितिज पटवर्धन म्हणतो. ‘आपण केलेल्या लेखनाचे विविध पैलू दिग्दर्शक म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत तपासता येतात. त्यात नव्यानं भर घालता येते. त्यामुळे लेखनासह दिग्दर्शनाचंही काम मी हाती घेतलं. माझे वडील गेली अनेक वर्षं बालरंगभूमीसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांनादेखील हे बालनाट्य पाहून आनंद होणार आहे’, असंही तो म्हणतो. तसंच ‘आज्जीबाई जोरात’ विनोदाच्या अंगानं जाणारी अशी फँटसी आहे. वय वर्षं पाचपासून त्यापुढील वयोगटातील मुलांना मनोरंजनासाठी कार्टून, बडबड गीतं इतकीच माध्यमं आहेत. म्हणूनच पालक आणि मुलं एकत्र पाहू शकतील अशी ही सुंदर अनुभव देणारी कलाकृती असेल, असंही क्षितिज म्हणाला.

Share

Leave a Reply