मुंबई – देशासह राज्यात आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असणार आहे. पुढील वर्षभरात राज्यात महापालिका, विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूका या एकत्र घेण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
या चर्चेदरम्यान भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणूका एकत्र होतील का? याबद्दल महत्वपूर्ण विधान केलं आहे. या आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले आहेत. लोकसभा- विधानसभा निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मला विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता वाटत नाही. आणि का व्हाव्यात? लोकसभेनंतर पुढे सहा-साडेसहा महिने वाचतात. निवडणूका एकत्र होण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे मी तरी म्हणेन की लोकसभा विधानसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता दिसत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत.