वडगावामध्ये तळ्यात बुडून मुलाचा मृत्यू

वडगावामध्ये तळ्यात बुडून मुलाचा मृत्यू

वडगाव मावळ : येथील रेल्वे स्टेशनजवळील घराच्या अंगणात खेळत असताना रविवारी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी श्री.पोटोबा महाराज मंदिराजवळील तळ्यात आढळून आला.

समर बाळू कराळे (वय ८ वर्षे, रा.वडगाव मावळ ) असे मृत बालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर हा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नव्हता.

त्यामुळे, त्याची आजी सुनीता दत्तात्रेय सुपेकर यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोटोबा महाराज मंदिरा मागील तळ्यात आढळून आला. तळेगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.समर हा वडगाव येथे त्याच्या आजी आजोबांकडे रहात होता. तो येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते पुढील तपास करत आहेत.

वडगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री.पोटोबा मंदिरा शेजारी ऐतिहासिक तळे असून सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. त्याच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. ती अपघाताला निमंत्रण देणारी आहे. या तळ्याच्या काठीच आठवडा बाजार भरतो. पोटोबा मंदिराच्या प्रांगणात अनेक लहान मुले खेळतात. त्यामुळे, तळ्याच्या संरक्षक भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. आठवडे बाजाराला होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता वडगाव नगरपंचायतीने सुरक्षा विषयक उपाय योजना तातडीने राबविण्याची आवश्यकता आहे.

Share

Leave a Reply