पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वायसीएममधील अनागोंदी कारभाराचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत असल्याने प्रशासनाच्या वतीने कठोर उपाययोजना त्वरित अंमलात आणाव्यात अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, वायसीएम रुग्णालय बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. हि बाब महापालिकेच्या प्रतिमेस काळीमा लावणारी आहे. वायसीएम रुग्णालयात सद्यस्थितीला तातडीक विभागामध्ये शिकाऊ डॉक्टर काम पाहत असून सिनिअर प्रोफेसर व डॉक्टर हे रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती बसून कामकाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असून रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवत आहेत. तसेच अतिदक्षता विभागात ट्रेनिंग नसलेल्या डॉक्टरांना उपचार देण्यास भाग पाडतात. विशेष तज्ञ डॉक्टर रुग्णांकडे कानाडोळा करताना दिसून येतात.
वायसीएम रुग्णालयाच्या जुन्या डॉक्टरांकडे अन्य विभागाचे पदभार दिले असल्याने यामुळे रुग्नसेवेच्या धोरणांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. रुग्णसेवेसाठी लागणारी उपकरणे देखील बंद स्थितीत आहेत. रुग्णालयातील एकूण 4 एक्स रे मशीन पैकी फक्त 1 मशीन चालू स्थितीत आहे. तसेच एकूण 5 पोर्टेबल एक्स- रे मशीन पैकी 2 चालू व 3 बंद स्थितीत आहे. पोर्टेबल मशीन खरेदीच्या फाईल 6 महिने भांडार विभागामध्ये धूळ खात पडून आहेत.
गरोदर महिलांच्या USG मशीन देखील बंद स्थितीत आहे.लहान व नवजात बालकांसाठी NICU देखील उपलब्ध होत नाही रुग्णालयात 30 प्रसूती खाटासाठीचा असलेल्या विभागामध्ये आता फक्त 10 खाटा शिल्लक आहेत. ऑपरेशन थिएटर देखील 9 पैकी 5 सुरु आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तीन तीन महिने उशिराची तारीख मिळत आहेत. तर तातडीच्या रुग्णांना काही डॉक्टरांच्या संबधातील खाजगी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला रुग्णालयातील अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तपासणी पथक व वरिष्ठ वायसीएम रुग्णालयामध्ये शहानिशा करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.