वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; का केला 16 हजार जणांचा वीज पुरवठा खंडित

पुणे – “पुणे परिमंडळामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 16 हजार 413 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी 71 हजार 98 थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.

 

पुणे परिमंडळामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 500 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 8हजार 511 वीजग्राहकांनी तीन महिन्यांत एकही वीजबिल भरलेले नाही व त्यांच्याकडे 42 कोटी 63 लाख रूपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. वारंवार आवाहन किंवा विनंती करूनही ज्या ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम गेल्या एप्रिल महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 13 कोटी 37 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आतापर्यंत 16 हजार 413 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी 71 हजार 98 ग्राहकांकडे 29 कोटी 28 लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे.

 

पुणे शहरात तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 26 हजार 796 ग्राहकांकडे 11 कोटी 81 लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यातील 6 हजार 536 ग्राहकांचा 4 कोटी 71 लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर उर्वरित 20 हजार 260 ग्राहकांनी थकीत 7 कोटी 12 लाख रुपयांचा ताबडतोब भरणा न केल्यास त्यांचाही वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरात 16 हजार 300 ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यांपासून 10 कोटी 91 लाख थकीत बिलांचा भरणा केलेला नाही. आतापर्यंत तीन हजार 209 वीजग्राहकांचा 3 कोटी 50 लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर आणखी 13 हजार 91 ग्राहकांकडे 7 कोटी 41 लाखांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

 

ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये 44 हजार 415 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी 19 कोटी 91 लाख रूपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला नाही. त्यातील 6 हजार 669 ग्राहकांचा वीजपुरवठा 5 कोटी 16 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर उर्वरित 37 हजार 747 वीज ग्राहकांकडे 14 कोटी 75 लाखांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

 

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. थकीत वीजबिलांच्या ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

 

Share

Leave a Reply