व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; तब्बल सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याची तस्करी करून विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई वनरक्षक विभागाने शनिवारी (दि.22) बावधन येथील रानवारा हॉटेल समोर केली आहे.

याप्रकरणी वनरक्षक सारिका दराडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. फिर्यादीवरून अटक आरोपी किशोर यशवंत डांगे (वय 45) व संदीप शिवराम कासार (वय 62) दोघे राहणार रत्नागिरी यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा ड्रायव्हर असून संदीप याची शेती तसेच हॉटेल व्यवसाय आहे. आरोपी हे व्हेल माशाच्या उलटी चा तुकडा कोणत्याही परवानगीशिवाय विक्रीकरिता घेऊन आले होते. याची माहिती मिळताच वनरक्षक विभागाकडून कारवाई करत दोघांनाही अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून वेल माशाची उलटी तसेच इतर साहित्य असा एकूण 3 कोटी सत्तावीस लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंजवडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात, नैसर्गिक रित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटी चा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटी ला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते.

Share

Leave a Reply