शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला सुवर्ण संधी, पण… | थर्ड आय – अविनाश चिलेकर

भाजप नेत्यांनी पाच वर्षांत केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे, पाच हजार हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसे पाणी देण्याचे आश्वासन देऊन झालेली घोर फसवणूक, पावणे दोन लाख अवैध बांधकामांचे नियमितीकरणाच्या थापा, स्मार्ट सिटी प्रकल्पातील सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा, रेडझोन सोडविण्याचे तद्दन खोटे आश्वासन, प्राधिकऱण संपादित क्षेत्रातील दीड लाख घरांना स्वमालकिसाठी `प्रॉपर्टी कार्ड` देण्याचा खोटा दावा, प्राधिकरणातील मूळ शेतकऱ्यांना एकरी पाच गुंठे परतावा देण्याच्या तारखा, शहराची झालेली कचरा कुंडी, दुपटीने वाढलेली अतिक्रमणे आणि पथारीवाले अशा असंख्य प्रश्नांची जंत्री आहे. २०१७ मध्ये हे प्रश्न सुटणार म्हणून भोळ्याभोबड्या जनतेने डोळे झाकून शहरात भाजपला सत्ता दिली. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार या पलिकडे भाजप नेत्यांना इथे एकही उलेल्खनिय काम केलेले नाही. राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करून तेच काम स्वतःचे असल्याचा डांगोरा पिटण्याची वेळ भाजपवर येते.

खाबुगिरीचे एक एक प्रकरण डोळ्यात अंजन घालणारे आहे. रा.स्व.संघाचे राष्ट्रीय विचार, मोदी-फडणवीस यांचे शुध्द निष्कलंक चारित्र, पारदर्शी कारभार पाहून लोकांनी परिवर्तन घडवून आणले. मात्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने शहराची सरदारकी ज्यांच्यावर सोपविली तेच सर्वात मोठे दलाल, ठेकेदार, दुकानदार निघाले. चौकिदार चोर नव्हे तर चक्क दरोडेखोर निघाले. भाजपचे अर्धे नगरसेवकच ठेकेदार आणि भागीदार बनले. `धन्वंतरी` देवतेच्या नावाशी संबंधीत एक कंपनी चक्क भाजप आमदारांसाठी दामदुप्पट दराने काम करू लागली. राज्यातील भाजपचा `लाड `का आमदार असलेल्या महोदयांनी ५०० कोटींचे स्मार्ट सिटीचे काम घेऊन महापालिकेला गंडा घातला. भामा आसखेड जॅकवेल कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला होता. त्याच जॅकवेलचे ३० कोटी वाढीव खर्चाचे काम आयुक्तांनी ऑर्डरसुध्दा दिली. यांत्रिक साफसफाईतही मोठा घोटाळा असल्याचे चक्क भाजपच्या आमदार अश्विनीताई जगताप सांगतात, मात्र राष्ट्रवादीची नेतेमंडळी तो मुद्दा लावून धरायचे सोडून देतात. कंत्राटी कामगारांचे बहुतेक सर्वच ठेके भाजपच्या नेत्यांचे आहेत. महिना किमान ५० लाख रुपये या ठेकेदारीतून कमावणारे किमान ३०-४० भाजपचे माजी नगरसेवक डोळ्यासमोर आहेत. कुत्र्यांच्या नसबंदी ठेक्यात ५-६ कोटींची लूट भाजपच्या स्थानिक नेत्याने केली. अवैध होर्डिंग काढून टाकायच्या ३ कोटींच्या ठेक्यात भाजपच्याच सरचिटणीसांनी पालिकेला दलाली करून फसवले. वृक्षगणना न करताच ३-४ कोटींचे बिल लाटणाराही भाजपचाच पदाधिकारी असतो. सर्वात मोठी बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताशी म्हणजेच देशद्रोह्यांशी लागेबांधे असणाऱ्या कंपनीशी संबंधीताना शहरातील भूमिगत इंटरनेट केबलचे ७०० किलोमीटरचे नेटवर्क सोपविण्यासाठी आटापीटा सुरू आहे. तिथेही भाजप शहराचा कडेलोट करू पाहते. त्यामुळे शहरातील आया बहिणींचीच नव्हे तर तमाम व्यापार, उद्योग, बँकांपासून प्रत्येक घराची सुरक्षा धोक्यात येणार आहे. भाजपच्या पदराखाली दडलेल्या या राक्षसांची पैसे कमावण्याची भूक खूप मोठी आहे. आज ९० टक्के ठेके भाजपच्या नेत्यांचे आहेत. महापालिका कायद्याने हे ठेकेदार नगरसेवक पोसण्याचे पाप भाजपने केले.

शहरातील कारखानदार, बिल्डर, व्यापारी यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारी लूट हा मोठा विषय आहे. भिक नको कुत्र आवर, अशी या मंडळींची गत झाली आहे. मोकळ्या जागा दिसल्या की मार ताबा, अशी एक टोळी भाजप नेत्याच्या पंखाखाली शहरातील सार्वजनिक जागांवर ताबे मारते. बिल्डर कोणी दिलसा की त्याचे काम आडवायचे आणि १०० फ्लॅटची स्किम असेल तर २५-३० टक्के भागीदारी किंवा १०-१५ फ्लॅट मागायचे हा फंडा झालाय. प्राधिकऱणाच्या मोकळ्या भूखंडांवर शेड मारायची आणि लाखो रुपये भाड्याने देऊन कार्यकर्त्याचे राजकारणाचे दुकान चालवायचे, असे राजरोस सुरू आहे. थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधीत प्रश्न असल्याने भोसरी, तळवडे रेडझोनमध्ये जागा खरेदी-विक्री आणि बांधकामालाही परवानगी नाही. प्रत्यक्षात भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने हजारो भूखंडांची विक्री झाली आणि थेट दिघी मॅगझिन डेपो म्हणजेच दारुगोळा साठ्याच्या जवळ वसाहतीच्या वसाहती उभ्या राहिल्यात. उद्या एखादा दहशतवादी इथे आला तर तो घातपाती घडवू शकतो आणि त्यात आख्खी भोसरी बेचिराख होऊ शकते. इतका गंभीर मामला आहे, पण सत्तेच्या लालसेने फडणवीसांचे सर्रास दुर्लक्ष आहे. शहरात भाजप काळातच रामराज्य सोडा, मोगलाई माजली, असे खासगीत लोक बोलतात.

पूर्वी म्हणजे २०१७ च्या अगोदरची २५ वर्षे ४,३०० कोटींची कागदपत्रे लेखापरिक्षणासाठी उपलब्ध नाहीत, मात्र नंतरच्या सात वर्षांचे अर्धेअधिक रेकॉर्ड आज सापडतच नसल्याचा अभिप्राय आहे. चोरी केल्याचा कुठलाही पुरावा शिल्लक ठेवायचा नाही, अशी हुशारी भाजपच्या या चोर नेत्यांनी केली. चार दोन सज्जन शिल्लक आहेत, पण वरपर्यंतची ही साखळी पाहून ते हाताची घडी तोंडावर बोट धरून बसलेत. ध्रुतराष्ट्री पवित्रा घेतलेल्या रा.स्व.संघाच्या धुरीण मंडळींनी त्यात तत्काळ लक्ष घालून हे गटार साफ करण्याची वेळ आलीय. अन्यथा हे डाग उद्या तुमच्याही कपड्यावर पडतील आणि नाहक भाजप बदनाम होईल.

राष्ट्रवादीचे आमदार आहेत कुठे ?
अजित पवार यांना माझा पाठिंबा म्हणत मीडियात झळकणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना भाजपच्या विरोधात आवाज उठवायला खूप मोठी संधी होती. प्रत्यक्षात पोटनिवडणुकिपासूनची त्यांची विधाने पाहिली तर त्यांचा एक पाय भाजपच्या घरात आहे. भ्रष्टाचाराचे एकही प्रकऱण त्यांनी काढले नाही की लावून धरलेले नाही. राष्ट्रवादी संघटनेच्या एकाही बैठकिलाही ते दिसत नाहीत की सभेला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे भाजप विरोधात मोर्चे काढतात, आयुक्तांना निवेदन देतात, कार्यकर्त्यांना घेऊन निदर्शने करतात. एकाही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार कधी दिसले नाहीत. शहरातील राष्ट्रवादीच्या कुंकवाचा धनीच गायब असतो. गेल्या चार वर्षांतील कामाचा लेखाजोखा घेतला तर एकही काम त्यांनी केल्याचे त्यांना स्वतःलाही सांगता येणार नाही. भोसरी, चिंचवड या दोन्ही भाजप आमदारांच्या मतदारसंघात विकास कामे, निधीचा महापूर असतो. विधीमंडळात किमान पाच-सहा लक्षवेधी, प्रश्नोत्तरे ते विचारतात. मात्र पिंपरी राखीव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अधिवेशनालाही नसता आणि विधान परिषदेच्या मतदानासाठी सुध्दा गैरहजर राहतात. आमदार अगदी उघडपणे भाजपशी हातमिळवणी करतात काय, अशी शंका असल्याने कार्यकर्तेही शांत बसतात, बिथरतात. खुद्द अजित पवार यांनी दोन वेळा तंबी देऊनही सुधारणा झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आपलाच आमदार असा बेफिकीर असेल तर अजित पवार यांना हे गांभिर्याने घ्यावे लागेल. भाजपला पूरक भूमिका म्हणजेच पक्षाशी द्रोह करणारे खुद्द आमदार असतील तर महापालिका निवडणुकिला अडचण होऊ शकते.

अजित पवार यांना प्रचंड स्कोप –
भ्रष्टाचाराची शहरातील बजबजपुरी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसला इथे महापालिकेसाठी प्रचंड स्कोप आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जे भांडवल उपलब्ध करून दिले त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या कपाळकरंट्यांना अजूनही घेता येत नाही. चिंचवड पोटनिवडणुकितच त्याचे प्रत्यंतर मिळाले. अपक्ष राहुल कलाटे यांची उमेदवारी आड आली, अन्यथा कसबा पोटनिवडणुकिसारखाच निकाल चिंचवडचा असला असता. आज अजित पवार यांच्यासारखा भक्कम नेता राष्ट्रवादीकडे आहे. शहरात घराघरात अजितदादांचे काम, शहरासाठीचे योगदान माहित आहे. शहरात राष्ट्रवादीकडे संघटनसुध्दा मजबूत आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळीसुध्दा भरभक्कम आहे. राज्यातील राजकिय हालचालींमुळे अजित पवार यांची भूमिका तळ्यात मळ्यात दिसली आणि संभ्रम सुरू झाला. तळागाळातील कार्यकर्त्यांना खात्री पटली की, खरोखर अजित पवार हे भाजपला मिळणार नाहीत, तर इथे राष्ट्रवादीसाठी चित्र खूपच आशादायी असेल. ७७ नगरसेवकांची भाजप उद्या पुन्हा पूर्वपदावर येऊ शकते. राष्ट्रवादीने आता बूथ पातळीवर काम सुरू केले हे चांगले झाले. शहरात १४०० बूथ आहेत. या एका एका बूथ प्रमुखाने आपापल्या परिसरातील भाजपने केलेल्या कुकर्तृत्वाचा पाढा वाचायचे ठरवले तरी हवा बदलेल. भाजपने राष्ट्रवादीसाठी आयते ताट वाढून ठेवलंय. राष्ट्रवादीच्या मंडळींना खाता आले पाहिजे. आता या भरल्या ताटावर बसायचे की उठून जायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे. अजितदादांनी थोडे खडसावून सांगितले आणि आहे ती यंत्रणा कामाला लावली तरी भाजपचा टांगा पलटी होईल आणि घोडेसुध्दा फरार होतील. दादा ते करतात की त्याच टांग्यात बसतात याकडे माध्यमांचे लक्ष आहे. घोडेमैदान जवळ आहे.

Share

Leave a Reply