पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल अशा ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल करण्यात येत आहे. वाकड येथील मॉल मध्ये मॉकड्रिल केल्यानंतर रहाटणी, पिंपळे सौदागर येथील दोन शाळांमध्ये मॉकड्रिल तर वल्लभनगर येथील एका शाळेत इवेक्युएशन ड्रिल व प्राथमिक अग्निशमन उपकरण हाताळणी प्रशिक्षण घेण्यात आहे.
गुरुवारी (दि. 18) रहाटणी येथील एसएनबीपी शाळेत अग्निशमन विभागाकडून एकाचवेळी आगीत जखमी झालेल्या इसमाला तिसऱ्या मजल्यावरून स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षित पद्धतीने खाली आणले. आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे. आगीच्या व आणीबाणीच्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता शाळा प्रशासन व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अग्निशमन उपकरणे हाताळण्याची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. रहाटणी येथील शाळेत 400 विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सब ऑफिसर विजय घुगे, सब ऑफिसर चंद्रशेखर घुले, लिडींग फायरमन अनिल वाघ, लिडींग फायरमन विकास तोडरमल, ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, वाहन चालक पाटील, ट्रेनी फायरमन परमेश्वर दराडे, मयुर नवगिरे, प्रशांत नवगिरे, ओंकार रसाळ, सखाराम चिमटे, निखिल जगताप, शाळेच्या प्राचार्या जयश्री वेंकटरमण, समन्वयक स्मिता शहापूरकर, समन्वयक बबिता बॅनर्जी, सुरक्षा व्यवस्थापक रमेश रावूल, क्रीडा विभाग प्रमुख हेमराज थापा उपस्थित होते. पिंपळे सौदागर येथील जी. के. गुरुकुल येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत योग्य तो समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल व वित्तहानी तसेच जीवितहानी होण्यापासून टाळता येईल, याबाबत विद्यार्थी व शिक्षकांना माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाकडून अग्निशमन उपकरणे यांची हाताळणी प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षकांकडून करून घेण्यात आली. यावेळी प्राचार्या मयुरी मेहता, प्रशासक प्रशांत नाईक यांच्यासह 300 विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. वल्लभनगर येथील जी जी इंटरनॅशनल स्कूल मध्ये इवेक्युएशन ड्रिल व प्राथमिक अग्निशमन उपकरण हाताळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सब ऑफिसर अनिल डिंबळे, लीडिंग फायरमन विकास नाईक व कर्मचारी उपस्थित होते.