समाजातील संभ्रम मिटवण्यासाठी काम करावे लागेल- रवींद्र मुळे 

पिंपरी – आपल्या भोवती अनेक संभ्रम पसरवून ठेवले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी अनेक संभ्रम निर्माण केले. त्यानंतर भारतातील काही लोकांनी ते संभ्रम डोळेझाकपणे पुढे नेले. त्यातून तार्किक आणि अभ्यासपूर्ण विचार करून बाहेर यावे लागेल. संभ्रमातून सत्याकडे जाण्यासाठी आपल्याला लढाई उभी करावी लागेल, असे प्रतिपादन व्याख्याते रवींद्र उर्फ राजाभाऊ मुळे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रवींद्र उर्फ राजाभाऊ मुळे यांनी गुंफले. यावेळी ते ‘भारतीय मानस : संभ्रमातून सत्याकडे’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे महेश चांडक, तसेच विश्वनाथन नायर, रमेश बनगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

रवींद्र मुळे म्हणाले, “भारतात इंग्रजांनी शिक्षण व्यवस्था आणली असल्याचे म्हटले जाते. मात्र इंग्रजांनी बाबुगिरीला चालना देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. भारतीय संस्कृतीत नोकरीला कनिष्ठ स्थान होते. असे असताना इंग्रजांच्या शिक्षण व्यवस्थेने नोकरीला प्राथमिक दर्जा दिला. ही आपली शोकांतिका आहे.

रवींद्र मुळे पुढे म्हणाले, “संभ्रमावस्थेत असलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी विचारवंतांनी वेळोवेळी प्रयत्न केले. भारतीय जनमानसात मंत्रविप्लव प्रकारचा संभ्रम पसरविण्यात आला. राष्ट्राच्या बाबतीत आपल्याकडे संभ्रम आहे. राष्ट्र, राष्ट्रीयत्व, राज्य, संघराज्य या संकल्पना पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. वैदिक काळापासून ते रामायण, महाभारतात देखील याचे आधार आढळतात. इतर राष्ट्रांच्या निर्मिती मध्ये भाषा हा प्रमुख घटक आहे. भारत हे राष्ट्र संस्कृतीच्या आधारे निर्माण झाले आहे.

दुसरा संभ्रम इतिहासाच्या बाबतीत आहे. हिंदू, मुस्लिम आणि इंग्रज असे तीन कालखंड सांगितले जातात. मात्र हा संभ्रम असून भारतीयांचा संघर्षाचा इतिहास हा त्याचे वास्तव आहे. इतिहासाची मोडतोड करून त्याचे वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले जात आहे. तिसरा संभ्रम धर्म आणि पंथ याबाबतचा आहे. हिंदू धर्म ही जीवन जगण्याची पद्धत आहे. अशा प्रकारचा निर्णय न्यायलयाने दिला आहे. ‘सर्वे भवंतू सुखिनः’, ‘हे विश्वची माझे घर’ असा विश्वव्यापी विचार करणारा हिंदू धर्म आहे. त्यातून आता भारताची विश्वगुरूत्वाची वाटचाल सुरू आहे. आपल्याकडे असलेल्या कलेच्या आणि ज्ञानाच्या माध्यमातून संभ्रमित समाजाला सत्याकडे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.

शैलेश भिडे यांनी सूत्रसंचालन, आभार व्यक्त केले. गिरीश देशमुख यांनी परिचय करून दिला.

Share

Leave a Reply